आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त पुण्यात 2000 हून अधिक योगसाधकांनी एकत्र येत केला सामूहिक योगाभ्यास
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त पुण्यात 2000 हून अधिक योगसाधकांनी एकत्र येत केला सामूहिक योगाभ्यास
पुणे, 21 जून 2025
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता पुणे येथे सिंहगड रोडवरील पंडित फार्म्स येथे एक भव्य योग कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 2000 योगप्रेमींनी एकत्र येत कॉमन योगा प्रोटोकॉल अंतर्गत सामूहिक योगाभ्यास केला.
या विशेष योग सत्रात भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालय व सहकारिता मंत्रालयाचे राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच राष्ट्रीय नैसर्गिक चिकित्सा संस्था (National Institute of Naturopathy – NIN), पुणे च्या संचालिका प्रा. डॉ. के. सत्य लक्ष्मी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व अतिथींनी स्वतः योगाभ्यासात सहभागी होत योगसाधकांना प्रेरणा दिली.
हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योगपीठ, संस्कृती प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय नैसर्गिक चिकित्सालय (NIN) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या संस्थांतील प्रशिक्षकांनी उपस्थित योगसाधकांना योग प्रोटोकॉलनुसार विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या तंत्रांचे सुसंगत मार्गदर्शन करत योगाभ्यास केला.
मंत्रीगणांनी आपल्या संदेशात सांगितले की, “योग केवळ शरीर निरोगी ठेवत नाही तर मानसिक समतोल, भावनिक स्थिरता आणि आत्मिक शांततेचा अनुभवही प्रदान करतो.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचेही त्यांनी कौतुक केले.
हा भव्य योग कार्यक्रम पुणे शहरासाठी गौरवाचे प्रतीक ठरला. विविध पार्श्वभूमीतील नागरिकांनी एकत्र येत ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेला प्रत्यक्षात साकार करत एकतेचा संदेश दिला. सहभागींच्या उत्साही उपस्थितीमुळे आणि कार्यक्रमाच्या सुयोग्य आयोजनामुळे हे योग सत्र प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरले.
* * *
PIB Pune | S.Nilkanth/S.Kane/D.Rane