जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट
जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट
नवी दिल्ली, 18 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडातील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली. मे 2025 मध्ये चॅन्सलर मर्झ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधे झालेली ही पहिलीच भेट होती.निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल आणि पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी चॅन्सलर मर्झ यांचे अभिनंदन केले.अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताबद्दल जर्मन सरकारने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनांबद्दल पंतप्रधानांनी मनापासून आभार व्यक्त केले.
द्विपक्षीय संबंधांमधील सातत्याबद्दल दोन्ही नेत्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला तसेच व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, हरित आणि शाश्वत विकास भागीदारी, हरित ऊर्जा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि गतिशीलता या प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीला 25 वर्ष पूर्ण झाली असून ती आणखी दृढ आणि वैविध्यपूर्ण करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली.
दहशतवाद हा जगातील शांतता आणि स्थिरतेसाठी एक मोठा धोका आहे,हे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.या संदर्भात, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला जर्मनीने समर्थन आणि ठाम पाठिंबा दर्शविल्याबद्दल पंतप्रधानांनी चॅन्सलर मर्झ यांचे आभार मानले.
महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली. परस्परांच्या सवडीनुसार भारतात चॅन्सलर मर्झ यांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar