पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार !
यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ–एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
पूर आणि अतिवृष्टीच्या या तडाख्यात जम्मू –काश्मीर मधील दोन अतिशय खास गोष्टींकडे बहुतांश लोकांचं लक्ष गेलं नाही, मात्र जेव्हा तुम्ही त्याबाबत ऐकाल तेव्हा तुम्हाला देखील खूप आनंद होईल. जम्मू–काश्मीरच्या पुलवामा येथील एका स्टेडिअममध्ये विक्रमी संख्येनं लोक जमले होते. इथं पुलवामा मधला पहिला दिवस–रात्र क्रिकेट सामना खेळला गेला. आधी असे घडणं अशक्य होतं, मात्र आता माझा देश बदलत आहे. हा सामना रॉयल प्रीमिअर लीगचा भाग आहे, ज्यात जम्मू –काश्मीरचे वेगवेगळे संघ खेळत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेले लोक, विशेषतः युवक, आणि तेही पुलवामा मध्ये रात्रीच्या वेळी, हजारोंच्या संख्येने क्रिकेटचा आनंद घेत आहेत – हे दृश्य खरोखरच पाहण्यासारखं होतं.
मित्रांनो, दुसरं आयोजन ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते आहे देशात प्रथमच आयोजित खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धा, आणि त्या देखील श्रीनगरच्या दल सरोवरात पार पडल्या. खरोखरच, अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी ही किती खास जागा आहे. जम्मू–काश्मीरमध्ये जलक्रीडा स्पर्धा लोकप्रिय बनवणं हा यामागचा उद्देश आहे. यामध्ये संपूर्ण देशभरातून 800हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. महिला खेळाडू देखील मागे राहिल्या नाहीत , त्यांचा सहभाग देखील जवळजवळ पुरुषांएवढा होता. मला त्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करायचं आहे ज्यांनी यात भाग घेतला. खास अभिनंदन मध्य प्रदेशचं ज्यांनी सर्वाधिक पदकं जिंकली, त्याखालोखाल हरियाणा आणि ओदिशाचा क्रमांक होता. जम्मू–कश्मीरचे सरकार आणि तिथल्या लोकांची आत्मीयता आणि आदरातिथ्य याची मी सर्वाधिक प्रशंसा करतो.
मित्रांनो, या आयोजनाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, मी विचार केला की त्यात सहभागी झालेल्या दोन खेळाडूंशी संवाद साधण्याचा, त्यापैकी एक आहे ओडिशाची रश्मिता साहू आणि दुसरा श्रीनगरचा मोहसीन अली ,चला ऐकूया ते काय म्हणतात ते .
पंतप्रधान : रश्मिता जी, नमस्ते!
रश्मिता : नमस्ते सर.
पंतप्रधान : जय जगन्नाथ.
रश्मिता : जय जगन्नाथ सर.
पंतप्रधान : रश्मिता जी सर्वप्रथम क्रीडाजगतातील या यशाबद्दल तुमचे खूप–खूप अभिनंदन.
रश्मिता : धन्यवाद सर,
पंतप्रधान : रश्मिता, आमचे श्रोते तुमच्याबद्दल आणि तुमच्या क्रीडा क्षेत्रातील प्रवासाबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक आहेत, त्याबद्दल सांगा.
रश्मिता : सर मी रश्मिता साहू . ओडिशामधून . आणि मी canoeing player आहे. मी 2017 पासून हा खेळ खेळत आहे. आणि मी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अजिंक्यपद आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आहे. मी 41 पदकं जिंकली आहेत. 13 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्य पदक. सर.
पंतप्रधान : या खेळाप्रती आवड कशी निर्माण झाली? सर्वप्रथम कुणी तुम्हाला याकडे वळण्यास प्रेरित केलं? तुमच्या घरात खेळाचं वातावरण आहे का?
रश्मिता : नाही सर. मी ज्या गावातून आले आहे, तिथे खेळाचं वातावरण नव्हतं. इथे नदीत बोटिंग सुरु होतं तेव्हा मी अशीच पोहायला गेले होते , मी आणि माझ्या मैत्रिणी असेच पोहत होतो तेव्हा एक बोट गेली canoeing- kayaking ची, तेव्हा मला त्याबाबत काही माहित नव्हतं. तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला विचारलं की हे काय आहे ? तेव्हा तिने सांगितलं की तिथे जगतपूर मध्ये साई स्पोर्ट्स सेंटर आहे, तिथे हे खेळ शिकवले जातात, मी देखील जाणार आहे.
मला खूप वेगळे वाटलं. ते काय आहे मला माहित नव्हतं, पाण्यात ही मुलं कशी खेळतात? Boating करतात का ? मी तिला म्हटलं की मलाही जायचं आहे. कसं जायचं ? मला पण सांग ? त्यावर तिथे जाऊन बोलायला सांगितलं. मग मी लगेच घरी जाऊन बाबांना सांगितलं की मला जायचं आहे. ते म्हणाले ठीक आहे, ते मला घेऊन गेले. त्यावेळी time trial नव्हती. तिथले प्रशिक्षक म्हणाले की परीक्षा फेब्रुवारीत असते, फेब्रुवारी –मार्च मध्ये त्या time trial च्या वेळी या. मग मी time trial च्या वेळी गेले.
पंतप्रधान : अच्छा रश्मिता, काश्मीरमध्ये झालेल्या ‘खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवातील ‘ तुमचा स्वतःचा अनुभव कसा होता ? प्रथमच काश्मीरला गेली होती ?
रश्मिता : हो सर, मी प्रथमच काश्मीरला गेले होते. तिथे ‘खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव ’ आयोजित करण्यात आलं होतं. त्यात मी दोन स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. सिंगल्स 200 मीटर आणि डबल्स 500 मीटर मध्ये. आणि मी दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे सर!
पंतप्रधान : अरे वाह ! दोन्हींमध्ये जिंकलं .
रश्मिता : हो, सर
पंतप्रधान : खूप–खूप अभिनंदन .
रश्मिता :धन्यवाद सर.
पंतप्रधान : अच्छा रश्मिता , वॉटर स्पोर्ट्स व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय आवडते ?
रश्मिता : सर , वॉटर स्पोर्ट्स व्यतिरिक्त मला खेळांमध्ये धावायला खूप आवडते. जेव्हा मी सुट्टीत जाते तेव्हा मी धावायला जाते , माझे जे जुनं मैदान आहे तिथं मी थोडेसे फुटबॉल खेळायला शिकले होते, त्यामुळे तिथे जेव्हा जाते मी खूप धावते आणि मी फुटबॉल देखील खेळते , थोडेफार .
पंतप्रधान : म्हणजे खेळ तुमच्या रक्तात आहे.
रश्मिता : हो सर, मी जेव्हा पहिली ते दहावी शाळेत होते, तेव्हा ज्या कुठल्या स्पर्धेत मी सहभागी व्हायचे त्या सगळ्यात मी पहिला क्रमांक पटकवायचे.
पंतप्रधान : रश्मिता ज्या लोकांना तुमच्याप्रमाणे खेळामध्ये प्रगती करायची आहे, त्यांना जर कुठला संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल ?
रश्मिता : सर अनेक मुले आहेत ,ज्यांना घराबाहेर पडायला बंदी असते आणि मुली असतील तर बाहेर कसे जाणार आणि कुणाकुणाच्या पैशाच्या अडचणी असतात, त्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागतो आणि ही जी खेलो इंडिया योजना आहे, त्यात अनेक मुलांना आर्थिक मदत मिळत आहे. आणि अनेक मुलांना खूप प्रकारची मदत मिळत आहे. त्यामुळे खूप मुले पुढे जाऊ शकत आहेत. आणि मी सर्वांना सांगेन की खेळणे सोडू नका, खेळाच्या माध्यमातून तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. त्यामुळे शरीराचा प्रत्येक अवयव तंदुरुस्त राहतो आणि खेळामध्ये पुढे जाऊन भारतासाठी पदक जिंकणं हे आमचे कर्तव्य आहे सर.
पंतप्रधान : बरं रश्मिता जी , मला खूप छान वाटलं , तुमचे पुन्हा एकदा खूप–खूप अभिनंदन आणि तुझ्या वडिलांना माझा नमस्कार सांगा , कारण त्यांनी इतक्या कठीण परिस्थितीत एका मुलीला पुढे जाण्यासाठी एवढे प्रोत्साहन दिलं , माझ्याकडून खूप–खूप शुभेच्छा , धन्यवाद .
रश्मिता : धन्यवाद सर.
पंतप्रधान : जय जगन्नाथ.
रश्मिता : जय जगन्नाथ सर.
पंतप्रधान : मोहसिन अली नमस्ते !
मोहसिन अली: नमस्ते सर !
पंतप्रधान : मोहसिन जी तुमचे खूप–खूप अभिनंदन आणि तुमच्या उज्वल भविष्यासाठी खूप–खूप शुभेच्छा .
मोहसिन अली : धन्यवाद सर.
पंतप्रधान : मोहसिन , खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल आणि त्यातही सर्वात पहिले सुवर्णपदक तुम्ही जिंकलं , तुम्हाला कसं वाटलं ?
मोहसिन अली :सर, मला खूप आनंद झाला. मी सुवर्णपदक जिंकलं , आणि खेलो इंडिया स्पर्धा पहिल्यांदा काश्मीरमध्ये पार पडली!
पंतप्रधान :लोकांमध्ये काय चर्चा आहे ?
मोहसिन अली : खूपच चर्चा होत आहे, सर, संपूर्ण कुटुंब खुश आहे.
पंतप्रधान : तुमच्या शाळेतले ?
मोहसिन अली : शाळेतले देखील सगळे खुश आहेत. काश्मीरमध्ये सगळे म्हणतात , तू तर सुवर्णपदक विजेता आहेस.
पंतप्रधान : मग आता तर तुम्ही मोठे सेलिब्रिटी बनला आहात .
मोहसिन अली :हो सर !
पंतप्रधान: अच्छा वॉटरस्पोर्टस बद्दल आवड कशी निर्माण झाली आणि त्याचे काय फायदे दिसत आहेत तुम्हाला ?
मोहसिन अली : लहानपणी मी पहिल्यांदा दल सरोवरात ती बोट चालताना पाहिली होती, वडिलांनी मला विचारले की तू हे करशील का, हो मलाही आवडते , मग मी तिथे मध्यभागी असलेल्या मॅडमकडे गेलो , मग मॅडमनी , बिल्किस मॅडमनी मला शिकवले.
पंतप्रधान : अच्छा, मोहसिन संपूर्ण देशभरातून लोक आले होते, प्रथमच वॉटरस्पोर्टस आयोजित करण्यात आले आणि ते देखील श्रीनगरमध्ये , ते देखील दल सरोवरात , एवढ्या मोठ्या संख्येने देशातले लोक आले तेव्हा तिथल्या लोकांची काय प्रतिक्रिया होती ?
मोहसिन अली : खूप आनंद झाला सर, सगळे म्हणत होते चांगली जागा आहे, सगळे चांगले आहे इथे , सगळ्या सुविधा चांगल्या आहेत. ‘खेलो इंडिया’ मध्ये इथे सगळे चांगले झाले.
पंतप्रधान : तर तुम्ही कधी काश्मीरच्या बाहेर कुठे खेळायला गेला आहात का?
मोहसिन अली : हो सर, मी भोपाळला गेलो आहे, गोव्याला गेलो आहे, केरळला गेलो, हिमाचलला गेलो आहे.
पंतप्रधान : अच्छा , तुम्ही तर संपूर्ण भारत पाहिला आहे.
मोहसिन अली : हो सर
पंतप्रधान : अच्छा एवढे सगळे खेळाडू तिथे आले होते.
मोहसिन अली : हो सर
पंतप्रधान : मग नवीन मित्र बनवले की नाही ?
मोहसिन अली : सर, खूप मित्र झाले , एकत्र या दल सरोवरात , लाल चौकात , सर्व ठिकाणी आम्ही फिरलो , पहलगामला देखील गेलो होतो सर, सगळ्या ठिकाणी.
पंतप्रधान : मी तर पाहिले आहे की जम्मू कश्मीर मध्ये प्रतिभावंत खेळाडू खूप आहेत .
मोहसिन अली : हो सर
पंतप्रधान: जम्मू आणि काश्मीरमधील आपले जे युवक आहेत त्यांच्यामध्ये देशाला गौरव मिळवून देण्याचे सामर्थ्य आहे आणि तुम्ही ते करून दाखवले आहे.
मोहसिन अली : सर, माझे स्वप्न आहे ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचे , तेवढेच स्वप्न आहे.
पंतप्रधान : वाह, शाबास.
मोहसिन अली : तेच स्वप्न आहे सर.
पंतप्रधान : तुमचे बोलणे ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला.
मोहसिन अली : सर, तेवढेच माझे स्वप्न आहे – ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणे. देशाचे राष्ट्रगीत वाजताना ऐकणे , बस तेच माझे स्वप्न आहे.
पंतप्रधान : माझ्या देशातील एका कामगार कुटुंबातील मुलगा एवढी मोठी स्वप्ने पाहतो, याचा अर्थ हा देश खूप पुढे जाणार आहे.
मोहसिन अली : सर, खूप पुढे जाणार आहे. इथे खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत; हे पहिल्यांदाच इथे घडले आहे सर.
पंतप्रधान : म्हणूनच शाळेतही तुमचा जयजयकार होत असेल.
मोहसिन अली : हो सर.
पंतप्रधान : अच्छा मोहसिन, तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं आणि माझ्याकडून तुमच्या वडिलांना विशेष धन्यवाद सांगा . कारण त्यांनी कष्टाचे जीवन जगूनही तुमचे जीवन घडवले आणि तुम्ही तुमच्या वडिलांना दिलेल्या शब्दाप्रमाणे अजिबात आराम न करता 10 वर्षे तपश्चर्या केली. ही खेळाडूसाठी खूप मोठी प्रेरणा असते आणि तुमच्या प्रशिक्षकांचे देखील मी खूप अभिनंदन करतो ज्यांनी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली , माझ्याकडून खूप–खूप शुभेच्छा, खूप–खूप अभिनंदन.
मोहसिन अली : धन्यवाद सर, नमस्कार सर, जय हिंद !
मित्रहो एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना देशाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि निश्चितच या मध्ये खेळाची महत्वपूर्ण भूमिका आहे आणि त्यामुळेच मी म्हणतो की, जो खेळतो तोच खुलतो, आपला देश सुद्धा जितके सामने खेळेल तितकाच तो बहरेल. आपल्या दोघा खेळाडूंना आणि आपल्या सहकार्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुम्ही युपीएससीचं नाव तर नक्की ऐकलं असेलच. ही संस्था देशातल्या सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. आपण सर्वांनी अनेक वेळा नागरी सेवा टॉपर्सच्या प्रेरणादायी मुलाखती ऐकल्या आहेत. कठीण परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर हे तरुण आपल्या कठोर परिश्रमानं या सेवेत स्थान मिळवतात – पण मित्रांनो, युपीएससी परीक्षेबद्दल आणखी एक सत्य आहे.
असेही हजारो उमेदवार असतात जे अत्यंत सक्षम असतात, त्यांची मेहनतदेखील इतरांपेक्षा कमी नसते परंतु मामुली फरकामुळे ते अंतिम यादीत पोहोचू शकत नाहीत. या उमेदवारांना इतर परीक्षांसाठी पुन्हा तयारी करावी लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातं. म्हणूनच, आता अशा हुशार विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल मंच तयार करण्यात आला आहे आणि त्याचं नाव आहे ‘प्रतिभा सेतू‘.
‘प्रतिभा सेतू’ मध्ये अशा उमेदवारांचा तपशील ठेवण्यात आला आहे ज्यांनी विविध युपीएससी परीक्षांचे सर्व टप्पे उत्तीर्ण केले आहेत परंतु त्यांचं नाव अंतिम गुणवत्ता यादीत झळकलं नाही. या पोर्टलवर अशा 10,000 हून अधिक हुशार तरुणांची डेटाबँक आहे. काही जण नागरी सेवांसाठी तयारी करत होते, काही अभियांत्रिकी सेवांमध्ये सामील होऊ इच्छित होते, काहींनी वैद्यकीय सेवांचा प्रत्येक टप्पा उत्तीर्ण केला होता परंतु अंतिम फेरीत त्यांची निवड झाली नाही – अशा सर्व उमेदवारांची माहिती आता ‘प्रतिभा सेतू’ पोर्टलवर उपलब्ध करून दिली जात आहे. खाजगी कंपन्या या पोर्टलवरून या हुशार विद्यार्थ्यांची माहिती मिळवू शकतात आणि त्यांना नोकरी देऊ शकतात. मित्रांनो, या प्रयत्नांचे निकालही मिळू लागले आहेत. या पोर्टलच्या मदतीनं शेकडो उमेदवारांना तात्काळ नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि जे तरुण थोड्या फरकानं थबकले होते ते आता नवीन आत्मविश्वासानं पुढे जात आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. भारतात लपलेल्या क्षमतेवर संपूर्ण जगाची नजर आहे. यासंबंधीचा एक आनंददायी अनुभव मी तुमच्यासोबत सामायिक करू इच्छितो. तुम्हाला माहीत आहे की आजकाल पॉडकास्ट खूप फॅशनमध्ये आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या विषयांशी संबंधित पॉडकास्ट पाहतात आणि ऐकतात. अलीकडेच मीही काही पॉडकास्टमध्ये सहभागी झालो. असाच एक पॉडकास्ट जगातले प्रसिद्ध पॉडकास्टर, लेक्स फ्रिडमन यांच्यासोबत केला होता. त्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली आणि जगभरातल्या लोकांनी तो ऐकलाही. आणि जेव्हा पॉडकास्टमध्ये चर्चा सुरू होती, तेव्हा मी संभाषणात एक विषय उपस्थित केला होता. जर्मनीतल्या एका खेळाडूनं तो पॉडकास्ट ऐकला आणि त्याचं लक्ष मी त्यात काय म्हटले होतं, यावर केंद्रित झालं. तो त्या विषयाशी इतका जोडला गेला की प्रथम त्यानं त्या विषयावर संशोधन केलं आणि नंतर जर्मनीतल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि मग त्यांनी एक पत्र लिहिलं की तो त्या विषयावर भारताशी संपर्क साधू इच्छितो.
तुम्ही विचार करत असाल की मोदीजींनी पॉडकास्टमध्ये अशा कोणत्या विषयावर चर्चा केली की ज्यामुळे एका जर्मन खेळाडूला प्रेरणा मिळाली ? हा विषय काय होता? मी तुम्हाला आठवण करून देतो की, पॉडकास्टमध्ये मी मध्य प्रदेशमधल्या फुटबॉल प्रेमी शहडोल गावाचा उल्लेख केला होता. खरंतर, मी दोन वर्षांपूर्वी शहडोलला गेलो होतो आणि तिथल्या फुटबॉल खेळाडूंना भेटलो होतो. पॉडकास्ट दरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात मी शहडोलच्या फुटबॉल खेळाडूंचाही उल्लेख केला होता. जर्मन फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक Dietmar Beiersdorfer (डायटमार बेयर्सडोर्फर ) यांनीही हेच ऐकलं होतं. शहडोलच्या तरुण फुटबॉल खेळाडूंच्या जीवन प्रवासानं त्यांना खूप प्रभावित केलं आणि प्रेरणा दिली. खरोखर, तिथले प्रतिभावान फुटबॉल खेळाडू इतर देशांचं लक्ष वेधून घेतील, याची कोणीही कल्पना केली नसेल. आता या जर्मन प्रशिक्षकानं शहडोलमधल्या काही खेळाडूंना जर्मनीतल्या अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली आहे.
यानंतर मध्य प्रदेश सरकारनंही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. लवकरच शहडोलमधले आपले काही तरुण मित्र प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जर्मनीला जाणार आहेत. भारतात फुटबॉलची लोकप्रियता सतत वाढत आहे हे पाहून मला खूप आनंद होतोय. मी फुटबॉलप्रेमींना विनंती करतो की जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा शहडोलला भेट द्यावी आणि तिथे होत असलेली क्रीडाक्रांती जवळून पहावी.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
सुरतमध्ये राहणाऱ्या जितेंद्र सिंह राठोडबद्दल जाणून तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचं मन अभिमानाने भरून येईल. जितेंद्र सिंह राठोड हे एक सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांनी असा एक अद्भुत उपक्रम हाती घेतला आहे जो प्रत्येक देशभक्तासाठी एक मोठी प्रेरणा आहे. गेल्या काही वर्षांपासून ते भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व सैनिकांची माहिती गोळा करत आहेत. आज त्यांच्याकडे पहिल्या महायुद्धापासून आतापर्यंत शहीद झालेल्या हजारो शूर सैनिकांची माहिती आहे. त्यांच्याकडे शहीदांचे हजारो फोटोदेखील आहेत. एकदा एका शहीदाच्या वडिलांचे शब्द त्यांच्या हृदयाला भिडले. शहीदाच्या वडिलांनी म्हटलं होतं, “मुलगा गेला तर काय झालं, देश तर सुरक्षित आहे ना!” या एका गोष्टीनं जितेंद्र सिंह यांच्या हृदयात देशभक्तीची एक अद्भुत ऊर्मी निर्माण झाली. आज ते अनेक शहीदांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. त्यांनी सुमारे अडीच हजार शहीदांच्या मातापित्यांच्या पायाची मातीही आणली आहे. हे त्यांच्या सशस्त्र दलांवरच्या प्रेमाचं आणि ओढीचं जिवंत उदाहरण आहे. जितेंद्रजींचं जीवन आपल्याला देशभक्तीची खरीखुरी शिकवण देतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आजकाल तुम्ही पाहिलं असेल की घरांच्या छतावर, मोठ्या इमारतींवर, सरकारी कार्यालयांमध्ये सौर पॅनेल चमकताना दिसतात. लोक आता त्याचं महत्त्व समजून घेत आहेत आणि ते खुल्या मनाने स्वीकारतही आहेत. आपल्या देशावर सूर्यदेवाने इतकी मोठी कृपा केली आहे तर मग त्यानं दिलेल्या उर्जेचा पुरेपूर वापर का करू नये?
मित्रांनो, सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांचं जीवनही बदलत आहे. तीच शेती, तीच मेहनत, तेच शेतकरी, पण आता कठोर परिश्रमाचं फळ खूप जास्त मिळत आहे. हा बदल होत आहे– सौर पंप आणि सौर भात गिरण्यांमुळे. आज देशातल्या अनेक राज्यांमध्ये शेकडो सौरभात गिरण्या सुरू झाल्या आहेत. या सौरभात गिरण्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबरोबरच त्यांच्या चेहऱ्यांवरचं तेजही वाढवलं आहे.
मित्रांनो,
बिहारच्या देवकीजींनी सौर पंपाच्या सहाय्यानं गावाचं नशीबच बदलून टाकलं आहे. मुझफ्फरपूरच्या रतनपुरा गावात राहणाऱ्या देवकीजींना आता लोक प्रेमानं “सोलर दीदी” म्हणतात. देवकीजी, त्यांचं जीवन सोपं नव्हतं. लहान वयात लग्न झालं, छोटंसं शेत, चार मुलांची जबाबदारी आणि भविष्याचं कोणतंही चित्र स्पष्ट नव्हतं. पण त्यांचं धैर्य कधीच कमी झालं नाही. त्या एका बचत गटात सामील झाल्या आणि तिथे त्यांना सौर पंपांबद्दल माहिती मिळाली. त्यांनी सौर पंपासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या. त्यानंतर सोलर दीदीच्या सौर पंपाने गावाचा चेहरामोहरा बदलला. जिथे पूर्वी फक्त काही एकर जमीन सिंचनाखाली येत होती, तिथे आता सोलर दीदीच्या सौर पंपामुळे 40 एकरपेक्षा जास्त क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचत आहे. गावातले इतर शेतकरीही सोलर दीदीच्या मोहिमेत सामील झाले आहेत. त्यांची पिकेही हिरवीगार होऊ लागली आहेत आणि त्यांचे उत्पन्नही वाढू लागलं आहे.
मित्रांनो,
पूर्वी देवकीजींचे आयुष्य चार भिंतींमध्ये बंदिस्त होते. पण आज त्या पूर्ण आत्मविश्वासानं आपलं काम करत आहेत, सोलर दीदी बनून पैसे कमवत आहेत आणि सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे त्या परिसरातल्या शेतकऱ्यांकडून युपीआयद्वारे पैसे घेतात. आता संपूर्ण गावात त्यांच्याकडे मोठ्या आदरानं पाहिलं जातं. त्यांचे कठोर परिश्रम आणि दूरदृष्टी यांनी हे सिद्ध केलं आहे की सौर ऊर्जा ही केवळ विजेचा एक स्रोत नाही तर ती प्रत्येक गावात नवीन प्रकाश आणणारी एक नवीन शक्ती आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
15 सप्टेंबरला भारताचे महान अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती असते. आपण तो दिवस अभियंता दिन म्हणून साजरा करतो. अभियंते फक्त यंत्रे बनवत नाहीत, तर ते स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणारे कर्मयोगी असतात. मी भारतातल्या प्रत्येक अभियंत्याचे कौतुक करतो. त्यांना मी शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
सप्टेंबरमध्येच भगवान विश्वकर्मांच्या पूजेचा पवित्र दिवसही येत आहे. 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा जयंती आहे. हा दिवस आपल्या विश्वकर्मा बांधवांना समर्पित आहे, जे पारंपरिक हस्तकला, कौशल्यं आणि ज्ञानविज्ञान बिनबोभाट एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत असतात. आपले सुतार, लोहार, सोनार, कुंभार, शिल्पकार, काष्ठकार मिस्त्री हे नेहमीच भारताच्या समृद्धीचा पाया राहिले आहेत. या विश्वकर्मा बांधवांना मदत करण्यासाठी सरकारनं विश्वकर्मा योजना देखील सुरू केली आहे.
मित्रांनो, आता मी मला तुम्हाला एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवू इच्छितो.
####
“तर तुम्ही प्रमाणपत्रात जे काही लिहिले आहे की मी राज्यांसाठी जे काही केले किंवा आमच्या सरकारनं हैदराबादसाठी जे काही केलं ते ठीक होतं पण तुम्हाला माहीत आहे की हैदराबादची कहाणी कशी आहे ते. आम्ही ते केलं, त्यात आम्हाला किती अडचणी आल्या! आम्ही सर्व राज्यांना, सर्व राजपुत्रांना वचन दिलं होतं की आम्ही कोणत्याही राजपुत्रासाठी किंवा राजासाठी चुकीचा निर्णय घेणार नाही. सर्वांना समान वागणूक मिळेल, सर्वांचं जे काही होईल, तेच त्यांच्यासोबतही होईल. पण त्यांच्यासाठी आम्ही तोपर्यंत एक वेगळा करार केला.”
#####
मित्रांनो, हा आवाज लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. हैदराबादमधल्या घटनांबद्दल त्यांच्या आवाजातल्या वेदना तुम्हालाही जाणवल्या असतील. पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये आपण हैदराबाद मुक्ती दिन देखील साजरा करणार आहोत. हा तोच महिना आहे जेव्हा आपण ‘ऑपरेशन पोलो‘मध्ये भाग घेतलेल्या सर्व शूरवीरांच्या धाडसाचं स्मरण करतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट 1947(एकोणीसशे सत्तेचाळीस) मध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हैदराबाद वेगळ्या परिस्थितीत होतं. निजाम आणि रझाकारांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले होते. तिरंगा फडकवल्याबद्दल किंवा ‘वंदे मातरम‘ म्हटल्याबद्दलही लोकांना मृत्युदंड देण्यात असे. महिला आणि गरिबांवर अत्याचार होत होते. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनीही इशारा दिला होता की ही समस्या खूप मोठी होत चालली आहे.
शेवटी सरदार पटेल यांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतलं. त्यांनी सरकारला ‘ऑपरेशन पोलो‘ सुरू करण्यास राजी केलं. आपल्या सैन्यानं हैदराबादला निजामाच्या हुकूमशाहीतून विक्रमी वेळेत मुक्त केलं आणि त्याला भारताचा हिस्सा बनवलं. संपूर्ण देशानं या यशाचा आनंद साजरा केला.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुम्ही जगात कुठेही जा, तिथे तुम्हाला भारतीय संस्कृतीचा प्रभाव नक्कीच दिसेल आणि हा प्रभाव जगातल्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित नाही तर तो लहान शहरांमध्येही दिसून येतो. इटलीतील कॅम्प–रोटोंडो या लहानशा शहरातही असंच काहीसं दिसून आलं आहे. महर्षी वाल्मिकींच्या पुतळ्याचं इथे अनावरण करण्यात आलं आहे. स्थानिक महापौरांसह परिसरातल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कॅम्प–रोटोंडोमध्ये राहणारे भारतीय वंशाचे लोक महर्षी वाल्मिकींच्या पुतळ्याच्या स्थापनेमुळे खूप आनंदी झाले आहेत. महर्षी वाल्मिकींचे संदेश आपल्या सर्वांना प्रेरणा देतात.
मित्रांनो, या महिन्याच्या सुरुवातीला कॅनडातल्या मिसिसागा इथेही भगवान श्रीराम यांच्या 51 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाबद्दल लोक खूप उत्साहित होते. भगवान श्रीराम यांच्या भव्य पुतळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केले गेले.
मित्रांनो,
रामायण आणि भारतीय संस्कृतीवरचं हे प्रेम आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. रशियामध्ये एक प्रसिद्ध ठिकाण आहे – व्लादिवोस्तोक. अनेक लोकांना त्या ठिकाणाची अशी ओळख आहे, जिथे हिवाळ्यात तापमान – 20 (उणे वीस) ते -30 (उणे तीस) अंश सेल्सिअस पर्यंत खाली येतं. या महिन्यात व्लादिवोस्तोकमध्ये एक अनोखं प्रदर्शन भरवण्यात आलं. त्यात रशियन मुलांनी रामायणातल्या विविध संकल्पनांवर काढलेल्या चित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. इथे एक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. जगाच्या विविध भागातली भारतीय संस्कृतीबद्दलची वाढती जागरूकता पाहून खरोखरच आनंद होतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी ‘मन की बात‘ मध्ये एवढंच. यावेळी संपूर्ण देश ‘गणेशोत्सव‘ साजरा करत आहे. येणाऱ्या काळात अनेक सण साजरे होतील. या सणांमध्ये तुम्ही स्वदेशी कधीही विसरू नये. भेटवस्तू त्याच, ज्या भारतात तयार झाल्या असतील, कपडे तेच, जे भारतात बनले असतील, सजावट तीच, जी भारतात बनवलेल्या साहित्यापासून केलेली असेल, रोषणाई तीच, जी भारतात बनवलेल्या झिरमिळ्यांपासून बनली असेल – आणि अशा अनेक गोष्टी, जीवनाच्या प्रत्येक गरजेची प्रत्येक गोष्ट, स्वदेशी असावी. अभिमानानं म्हणा ‘ही स्वदेशी आहे‘, अभिमानानं म्हणा ‘ही स्वदेशी आहे‘, अभिमानानं म्हणा ‘ही स्वदेशी आहे‘. आपल्याला या भावनेनं पुढे जायचं आहे. एकच मंत्र ‘व्होकल फाॅर लोकल‘, एकच मार्ग ‘आत्मनिर्भर भारत‘, एकच ध्येय ‘विकसित भारत‘.
मित्रांनो,
या सर्व आनंदात स्वच्छतेवर भर देत राहा, कारण जिथे स्वच्छता असते तिथे उत्सवांचा आनंदही वाढतो. मित्रांनो, ‘मन की बात‘ साठी असेच तुमचे संदेश मोठ्या संख्येनं मला पाठवत राहा. या कार्यक्रमासाठी तुमची प्रत्येक सूचना खूप महत्त्वाची आहे. तुमचा अभिप्राय मला पाठवत राहा. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण आणखी नवीन विषयांवर चर्चा करू.
खूप खूप धन्यवाद, नमस्कार.
***
यश राणे / आकाशवाणी / परशुराम कोर
***