Current Affairs

“गर्व से स्वदेशी” या भावनेने आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न  भारत घडवण्यासाठी स्वदेशी मार्गांचा स्वीकार करण्यास प्रेरित केले पाहिजे” – डॉ. मनसुख मांडविया

“गर्व से स्वदेशी” या भावनेने आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न  भारत घडवण्यासाठी स्वदेशी मार्गांचा स्वीकार करण्यास प्रेरित केले पाहिजे” – डॉ. मनसुख मांडविया

 

राजधानी दिल्लीत आज सकाळी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम चैतन्याने बहरुन गेले होते. औचित्य होते, राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 च्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल या विशेष आवृत्तीचे आयोजनाचे. या कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा महासंघाचाही सहभाग होता. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी समारंभाचे नेतृत्व केले. हा कार्यक्रम हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर आयोजित तीन दिवसांच्या क्रीडा उत्सवाच्या सांगतेचा भाग होता.

ना इंजन, ना शोर,
पैडल से बढ़े आत्मनिर्भर भारत की ओर…

📍 कर्त्तव्य पथ#SundaysOnCycle pic.twitter.com/1tGmVyuyoS

डॉ. मांडविया यांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली “भारतीयांना मातीशी जोडणारी, शाश्वततेला प्रोत्साहन देणारी आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला मूर्त रूप देणारे अभियान आहे” असे डॉ. मांडविया यांनी यावेळी बोलताना सांगितले. “तीन दिवसांच्या राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभाचे रूपांतर खऱ्या अर्थाने जनचळवळीत झाले आहे. खेड्यातील मैदानापासून ते राष्ट्रीय स्टेडियमपर्यंत, जवळजवळ 30 कोटी भारतीयांनी क्रीडा, तंदुरुस्ती आणि मेजर ध्यानचंद जी यांचा वारसा साजरा केला, असे डॉ. मांडविया यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. हा अभूतपूर्व सहभाग भारतातील वाढती क्रीडा संस्कृती आणि तंदुरुस्तीला जीवनशैली बनवण्याच्या आपल्या सामूहिक निर्धाराचे द्योतक आहे,” असेही त्यांनी सांगितले.

सायकलिंग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर आपल्या मुळांशी पुन्हा जोडले जाणे आहे असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे राष्ट्रव्यापी स्वरूप अभूतपूर्व होते. देशभरातील 700 जिल्ह्यांमधील 10,000 हून अधिक ठिकाणांहून सुमारे 30 कोटी नागरिक खेळाच्या मैदानावरील उपक्रम, सायकलिंग रॅली आणि पारंपरिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. देशाच्या विविध भागांतून 3,000 हून अधिक नमो फिट इंडिया सायकलिंग क्लब देखील यात सामील झाले आणि ज्यामुळे तंदुरुस्ती, शाश्वतता आणि सामुदायिक भावनेचा संदेश बळकट झाला.

हिमालयाच्या खोऱ्यांपासून ते किनारपट्टीवरील शहरांपर्यंत, गजबजलेल्या महानगरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत, भारताने राष्ट्रीय क्रीडा दिन 2025 च्या ऐतिहासिक तीन दिवसांच्या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायकल मोहिमेत सहभाग नोंदविला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी समांतर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात नामवंत खेळाडू व लोकप्रतिनिधींनी नागरिकांसोबत सहभाग घेतला.

या उपक्रमाला अधिक गती देत मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात ‘रविवारी सायकल स्वारी  – ‘संडेज ऑन सायकल या विशेष आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ  या कार्यक्रमाला  उपस्थित होते. रक्षा  खडसे यावेळी म्हणाल्या, “डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मंत्रालय गेल्या वर्षभरापासून देशभरात ‘संडेज ऑन सायकल उपक्रम राबवत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुंबईत आज यात सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला. लोकांमध्ये  आरोग्यसंपन्नतेबाबत जागरूकता निर्माण करणे, ही या उपक्रमामागची प्रेरणा आहे.”

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी मुलांमध्ये शारीरिक व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियासाठी पुढाकार घेतला आहे आणि सर्व मुलांनी हा उपक्रम अवलंबावा.”

दिल्लीतील कार्यक्रमात हजारो नागरिक, खेळाडू व आरोग्यसंपन्नता प्रेमींनी सहभाग घेतला. राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे (एनएसएफ) प्रमुख व पदाधिकारी यांनी डॉ. मनसुख मांडविया यांच्यासोबत सायकल चालवून देशातील क्रीडा संस्थांची आरोग्यसंपन्नतेला जनचळवळीच्या स्वरूपात प्रोत्साहन देण्याची बांधिलकी अधोरेखित केली.

ध्यानचंद पुरस्कारप्राप्त भारताच्या  माजी बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे  यावेळी विशेष पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या.आजचे वातावरण खरोखरीच विस्मयकारक आणि चैतन्य तसेच उत्साहाने भारलेले आहे.रविवारी सकाळी सर्व  वयोगटातले लोक इथे जमले आहेत.फिट इंडिया मोहीम सुरु केल्याबद्दल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानू इच्छिते असे त्या म्हणाल्या.

क्रीडा संकुल  परिसरात सकाळीच झुंबा, योग, दोरीउड्या, आरोग्यसंपन्नतेचे खेळ असे उपक्रम झाले. तसेच, मनाली येथे प्रशिक्षण पूर्ण करून एव्हरेस्ट सर करण्यासाठी सज्ज असलेल्या 11 तरुण गिर्यारोहक मुलींच्या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रयागराजहून दिल्लीपर्यंत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल चालवणाऱ्या सायकलपटूंनाही सन्मानित करण्यात आले.

आजच्या इतर ठळक घडामोडींमध्ये बेंगळुरू येथील एसएआय एनएसएससी मध्ये पॅरालिम्पियन अंकुर धामा व रवी रोंगाली यांच्या नेतृत्वाखाली काढलेली सायकल फेरी तसेच ओडिशातील क्रीडा संघटनांच्या सहकार्याने एसएआय एनसीओइ जगतपूर व एसटीसी कटक येथे पार पडलेले उपक्रम यांचा समावेश होता.

फिट इंडिया,संडेज ऑन सायकल उपक्रम सुरुवातीपासून आतापर्यंत देशभरातील 40,000 पेक्षा अधिक ठिकाणी सुमारे सात लाख नागरिकांपर्यंत पोहोचला आहे. युवक व क्रीडा मंत्रालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जात असून त्याला सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय), योगासन भारत आणि माय भारत या संस्थांचे सहकार्य आहे. हा उपक्रम राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची राजधानी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (एसएआय) प्रादेशिक केंद्रे, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे (एनसीओइ), एसएआय प्रशिक्षण केंद्रे (एसटीसी) आणि खेलो इंडिया केंद्रे येथे एकाच वेळी राबवला जातो.

***

निलीमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / शैलेश पाटील / परशुराम कोर

*** 

Visitor Counter : 25