एक पृथ्वी, एक आरोग्य’ साठी योग: सदर्न कमांडने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा
एक पृथ्वी, एक आरोग्य’ साठी योग: सदर्न कमांडने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा
पुणे, 21 जून 2025
सदर्न कमांडने 21 जून 2025 रोजी पुण्यात 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय आवडीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात सर्व स्तरांतील अधिकारी, सैनिक, निवृत्त सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या वर्षीच्या “एक पृथ्वी, एक आरोग्य” (Yoga for One Earth, One Health) या जागतिक संकल्पनेला अनुसरून, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक लवचिकता वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगासने केली.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड यांनी या सोहळ्याचे नेतृत्व केले. सदर्न कमांडच्या सर्व केंद्रांवरही सर्वांगीण कल्याणाला प्रोत्साहन देणाऱ्या योग सत्रांचे आयोजन करण्यात आले.
या सत्रादरम्यान, शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक संतुलन आणि आव्हानात्मक वातावरणात मानसिक कणखरता वाढवण्यात योगाभ्यासाची भूमिका प्रामुख्याने अधोरेखित करण्यात आली. या कार्यक्रमातून भारतीय सैन्याची सर्वांगीण कल्याणासाठी आणि ऑपरेशनल सज्जतेसाठी असलेली कटिबद्धता दिसून आली.
ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने, सद्गुरू हठयोग गुरुकुलममधील चार प्रशिक्षित हठयोग शिक्षकांनी, पुण्यातील वीस समर्पित ईशा स्वयंसेवकांच्या मदतीने या सत्रात मार्गदर्शन केले. सहभागींनी विविध योगाभ्यास पद्धतींचा सराव केला, ज्यात पाठीच्या कण्यासाठी योगा नमस्कार (Yoga Namaskar), ऊर्जा मार्ग शुद्ध करण्यासाठी नाडी शुद्धी आणि 7 मिनिटांचे मिरॅकल ऑफ माइंड मेडिटेशन यांचा समावेश होता. ऊर्जा, मानसिक स्पष्टता आणि भावनिक स्थिरता वाढवण्यासाठी या सर्व प्रकारांची रचना करण्यात आली होती. हा सोहळा आपल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाची जपणूक करण्याच्या आणि आपल्या कालातीत योगिक परंपरांना आत्मसात करण्याच्या भारतीय सैन्यदलाच्या समर्पणाची पुष्टी करणारा होता.
* * *
PIB Pune | S.Kane/S.Patil/D.Rane