Current Affairs

जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट

जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट

नवी दिल्ली, 18 जून 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अल्बर्टामधील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झाली

कॅनडात अलिकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंतप्रधान कार्नी यांनी पदभार स्वीकारला,त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती. या भेटीमुळे दोन्ही देशांना भारत-कॅनडा संबंधाची स्थिती आणि पुढील वाटचालीबाबत मोकळेपणाने आणि दूरदृष्टीने चर्चा करण्याची संधी मिळाली.

सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याचा आदर करणाऱ्या तसेच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांचे पालन करण्याप्रति वचनबद्धतेवर आधारित भारत-कॅनडा संबंधांचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी पुनश्च अधोरेखित केले. तसेच परस्पर संबंध आणि संवेदनशीलतेबद्दल आदर,नागरीकांमधील दृढ संबंध आणि वाढत्या आर्थिक  संलग्नतेवर आधारित रचनात्मक आणि संतुलित भागीदारी करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. या संदर्भात, दोन्ही बाजूंनी संबंधांमध्ये स्थैर्य  प्रस्थापित  करण्यासाठी समतोल आणि रचनात्मक पावले उचलण्याबाबत सहमती दर्शवली,ज्याची सुरुवात उच्चायुक्तांना एकमेकांच्या राजधानीत लवकर परतण्यास सांगण्यापासून झाली आहे.

संबंधांमधील विश्वास आणि गती पुन्हा निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रात वरिष्ठ मंत्री-स्तरीय तसेच कृती – स्तरावर  संवाद  पुन्हा सुरू करण्याचे महत्त्व नेत्यांनी अधोरेखित केले.

स्वच्छ ऊर्जा, डिजिटल परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्ता, एलएनजी, अन्न सुरक्षा, महत्वपूर्ण  खनिजे, उच्च शिक्षण,गतिशीलता आणि पुरवठा साखळी लवचिकता यासारख्या क्षेत्रांतील भविष्यातील सहकार्याच्या संधींवर नेत्यांनी चर्चा केली. तसेच त्यांनी मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राला  प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या सामायिक हिताला दुजोरा दिला.व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा मार्ग प्रशस्त  करण्यासाठी, अर्ली प्रोग्रेस ट्रेड अ‍ॅग्रीमेंट (EPTA) वरील रखडलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या महत्त्वावरही नेत्यांनी चर्चा केली. या संदर्भातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्याचे मान्य केले.  

दोन्ही नेत्यांनी जी 7 शिखर परिषदेत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीची आणि हवामान कृती,समावेशक विकास  आणि शाश्वत विकास यासारख्या बाबींना प्राधान्य  देऊन एकत्रितपणे रचनात्मकपणे कार्य करण्याची सामायिक इच्छा असल्याचे मान्य केले.

दोन्ही देशांमधील  नागरीकांमधील दृढ  संबंध नेत्यांनी अधोरेखित केले आणि दोन्ही देशांच्या लाभासाठी या मानवी सेतूचा वापर करण्याचे मान्य केले.

यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले आणि लवकरच  पुन्हा एकमेकांना भेटण्याची अपेक्षा व्यक्त केली.

S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar