जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
नवी दिल्ली, 18 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडातील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष डॉ. क्लाउडिया शेनबाउम पार्डो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.पंतप्रधानांनी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांचे त्यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले.
दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात मेक्सिकोने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष शेनबाउम यांचे आभार मानले.भारत आणि मेक्सिको यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीपूर्ण संबंध अधोरेखित करत, दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, स्टार्टअप्स, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाहननिर्मिती उद्योग तसेच लोकांमधील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली. दोन्ही देशांमधील वाढत्या व्यापार आणि गुंतवणूक सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करताना, नेत्यांनी ‘निअर-शोरिंग’ संदर्भातील मेक्सिकोने देऊ केलेल्या संधींवर चर्चा केली.औषधनिर्मिती क्षेत्रातील वाढत्या संधींवर यावेळी विशेष भर देण्यात आला, परवडणारी आणि दर्जेदार औषधे पुरवण्यात तसेच कृषी व समग्र आरोग्य क्षेत्रात भारत महत्त्वाचा भागीदार ठरू शकतो, यावर चर्चेत भर देण्यात आला.
तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या प्रगतीबद्दल राष्ट्राध्यक्ष शेनबाउम यांनी कौतुक केले आणि या क्षेत्रात भारतासोबत सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. सेमीकंडक्टर , कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजे यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी शोधण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. यासोबतच, दोन्ही देशांमधील तज्ञांमधील आगामी संवाद तसेच दोन्ही देशातील सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध यामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.
भागीदार देश म्हणून, दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर तसेच ” ग्लोबल साउथच्या” प्राधान्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. 2016 मधील मेक्सिको दौऱ्याच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष शेनबाउम यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले.
S.Kane/R.Dalekar/P.Malandkar