Current Affairs

प्रथमच आयोजित सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉन 2025 ची नेत्रदीपक सांगता

प्रथमच आयोजित सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉन 2025 ची नेत्रदीपक सांगता

 

पहिल्या सेखों भारतीय हवाई दल मॅरेथॉन 2025 (एसआयएम-25) चे आज भव्य आयोजन करण्यात आले आणि या द्वारे देशभरात तंदुरुस्ती, शौर्य आणि अभिमानाच्या उत्सवाचा संदेश देण्यात आला.

दिल्ली येथे झालेल्या या मॅरेथॉनमध्ये  विविध वयोगटातल्या 12,000 हून अधिक पुरुष, महिला आणि  धावपटूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. देशभरातील 46 हवाई  दल  तळांवरून 45,000 पेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले.  21 किमी, 10 किमी आणि 5 किमी या गटांमध्ये ही मॅरेथाॅन झाली. या सहभागातून भारतीय हवाई दल समुदायाची सर्वसमावेशकता, उत्साह आणि सामूहिक अभिमानाची भावना प्रकट झाली.

या कार्यक्रमाला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, आणि हवाई दल प्रमुख  एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, तसेच हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट आरोग्य आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्वाचा परिचय देताना एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग स्वतः 21 किमी दौडमध्ये सहभागी झाले आणि हवाईदलाच्या जवानांसह नागरिकांना प्रेरित केले.

कार्यक्रमाची रंजकता वाढवण्यासाठी नेटफ्लीक्सने प्रसिध्द अभिनेते हुमा कुरेशी, शेफाली शाह, अर्चना पूरन सिंग आणि सुनील ग्रोवर यांची  उपस्थिती निश्चित केली होती. या प्रसंगी नेटफ्लीक्सच्या `ऑपरेशन सफेद  सागर` या मालिकेच्या टीझरचे अनावरण  करण्यात आले.  ही मालिका कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने दाखवलेल्या पराक्रम, जिद्द आणि धैर्याचे प्रभावी चित्रण करते.

ही मॅरेथॉन परमवीर चक्र विजेते फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखों यांच्या शौर्याला योग्य अशी आदरांजली ठरली. त्यांच्या वारशाचा सन्मान करत आणि पुढील पिढ्यांना त्यांच्या धैर्य आणि समर्पणाचा आदर्श घेण्यास याद्वारे प्रेरित केले. हा दिवस खऱ्या अर्थाने भारतीय हवाईदलाच्या ताकद, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचे तेजस्वी प्रतीक असलेल्या अदम्य निश्चयाचा उत्सव होता.

 

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

Visitor Counter : 98