टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (TCIL) ला द फॉर्च्यून लीडरशिप अवॉर्ड्स 2025 मध्ये एचआर उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (TCIL) ला द फॉर्च्यून लीडरशिप अवॉर्ड्स 2025 मध्ये एचआर उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2025
दूरसंचार विभागांतर्गत मिनीरत्न श्रेणी मधील शेड्यूल ‘A’ मधील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (टीसीआयएल) ला फॉर्च्यून लीडरशिप अवॉर्ड्स 2025 मध्ये एच आर अर्थात मनुष्यबळ संसाधन उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्लू प्लाझा येथे 11 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने मनुष्यबळ संसाधनातील उत्कृष्ट पद्धतींची अंमलबजावणी, कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास, नवोन्मेष आणि सर्वसमावेशकता या क्षेत्रात केलेल्या उकृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला. आयुष मंत्रालयाचे माजी सदस्य डॉ. दिनेश उपाध्याय आणि भारतीय महसूल सेवेतील अधिकारी एम. एस. नेत्रपाल यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला तर टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडचे मुख्य महाव्यवस्थापक (HR) पी. सुरेश बाबू यांनी तो स्वीकारला. या कार्यक्रमाला सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भविष्यासाठी सज्ज सक्षम कार्यबल निर्मितीसाठी टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने 2021 ते 2025 या कालावधीत मिशन कर्मयोगी या उपक्रमाशी सुसंगत असे मनुष्यबळ विकासाशी संबंधित अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये सर्वसमावेशक मनुष्यबळ संसाधन धोरण, उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या हेतूने कामाच्या स्वरूपानुसार पुनर्रचना, गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती, पदोन्नतीसाठी वेळोवेळी समित्यांची बैठक, कामगिरीच्या आधारे मूल्यांकन आणि प्रोत्साहन देणारी कार्यप्रणाली, पुरस्कार यंत्रणा, ई-ऑफिस आणि ERP द्वारे डिजिटायझेशन अर्थात डिजिटल साधनांचा वापर या महत्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.
टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने कौशल्य निर्मितीवर भर दिला असून 58 अधिकाऱ्यांनी सायबर सुरक्षा, नेटवर्किंग आणि लेख परीक्षणामध्ये जागतिक स्तरावरील प्रमाणपत्रे मिळवली आहेत. ज्यामुळे उच्च मूल्य असलेल्या प्रकल्पांमध्ये सेवा वितरणाची गुणवत्ता वाढली आहे. या विविध उपाययोजनांमुळे संघटनात्मक कार्यक्षमता आणि व्यवसाय वृद्धीला बळकटी मिळाली आहे.
सर्वसमावेशकता, पारदर्शकता आणि नवोन्मेष या घटकांना प्रोत्साहन देऊन टीसीआयएलने विकसित केलेली नागरिक केंद्रित संस्कृती, डिजिटल इंडिया, स्मार्ट शहरे आणि भारत नेट सारख्या राष्ट्रीय प्राधान्यांना पाठिंबा देत आहे. तर धोरणात्मक दृष्टी, तंत्रज्ञानावर भर आणि प्रतिभेचा विकास यामुळे टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड ही भारताच्या डिजिटल परिवर्तनात अग्रगण्य भूमिका बजावणारी सार्वजनिक क्षेत्रातील आदर्श संस्था ठरली आहे.
एच आर उत्कृष्टता पुरस्कार म्हणजे आमच्या टीमने समर्पणवृत्तीने केलेल्या अभिमानास्पद कामगिरीची पोचपावती आहे,असे टीसीआयएलचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक संजीव कुमार यांनी सांगितले. टीसीआयएलमध्ये आम्ही नवोन्मेषी आणि डिजिटल इंडियाशी सुसंगत सर्वसमावेशक कार्यबल घडवतो, हे आमच्या शाश्वत विकासाच्या आणि एकात्म राष्ट्राच्या ध्येयाला बळकट करते, असे ते म्हणाले.
टीसीआयएल विषयी : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिची स्थापना 1978 मध्ये झाली आहे. टीसीआयएल ही जागतिक स्तरावर अग्रगण्य दूरसंचार सल्लागार आणि अभियांत्रिकी संस्था म्हणून ओळखली जाते. टीसीआयएल, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात एंड-टू-एंड सोल्यूशन्स प्रदान करते. टीसीआयएलने 100 हून अधिक देशांमध्ये 500 पेक्षा जास्त प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. भारताच्या डिजिटल प्रगतीमध्ये आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार सहभागामध्ये टीसीआयएल महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
आशिष सांगले/भक्ती सोनटक्के/ प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai