केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय पोषण माहनिमित्त भोर तालुक्यामध्ये बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन
केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय पोषण माहनिमित्त भोर तालुक्यामध्ये बहुमाध्यम प्रदर्शनाचे आयोजन
पुणे,14 ऑक्टोबर 2025
केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार तर्फे राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत बहुमाध्यम माहिती व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान पुणे जिल्ह्यातील भोर येथे उपजिल्हा रुग्णालयात हे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
हे तीन दिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून भोर मधील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्यासाठी योग्य आहार आणि त्यातून जपले जाणारे आरोग्य याविषयीची माहिती घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो तर्फे करण्यात येत आहे.
या प्रदर्शनात 360 डिग्री कॅमेरा, डिजीटल प्रश्नमंजुषा, 3 डी सेल्फी बूथ, सिग्नेचर बोर्ड, डिजीटल माहिती पुस्तिका, एलईडी स्क्रीनवर पोषण आहाराविषयी माहिती देणारे व्हिडिओ अशी आकर्षणे देखील मांडण्यात आली आहेत. आपल्या आहारातून कमी झालेल्या भरड धन्याविषयी देखील या प्रदर्शनात माहिती देण्यात आली आहे. हे तीनही दिवस पुण्यातील प्रसन्न फौंडेशनचे लोककलावंत जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रम करतील.
माहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत काम करणारे केंद्रीय संचार ब्युरो, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद पुणे व उपजिल्हा रुग्णालय, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचत गटातील महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी या प्रदर्शनास भेट देतील; तसेच तीन दिवस होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. यानिमित्ताने पोषण आहार पाककृती स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय आणखी काही स्पर्धांद्वारे शारीरिक पोषाणाविषयी जनजागृती केली जाणार आहे.
पीआयबी पुणे/शिल्पा पोफाळे/प्रिती मालंडकर